अहिल्यानगर : भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे राजकीय हाडवैरी काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्याही संगमनेर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक एकाचवेळी होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मंत्री विखे यांनी संगमनेर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही. विखे कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात थोरात यांनीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
गणेश साखर कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यात होती. भाजपचे विवेक कोल्हे आणि कॉंग्रेसचे नेते थोरात यांनी रूटी केली आणि गणेश कारखाना निवडणुकीत थोरात- कोल्हेंनी एकत्र येत विखेंच्या मंडळाचा दारूण पराभव केला.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी संगमनेरात लक्ष घालून थोरातांचा पराभव करत ‘गणेश’सह लोकसभेचा बदला घेतल्याचे बोलले गेले.
जिल्ह्यातील विखे व थोरात या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांच्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीत टोकाला गेला होता.साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही त्याच्या पुनःप्रत्ययाची शक्यता आहे.यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्येही विखे कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.
आता संगमनेरात महायुतीचे अमोल खताळ हे आमदार आहेत. कारखाना निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील का, याकडे लक्ष असेल. दुसरीकडे पराभव थोरातांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘प्रवरे’च्या कार्यक्षेत्रातील विखे विरोधकांना थोरात ताकद देतील का, की आपापले कारखाने बिनविरोध करण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या विखे-थोरातांची सहमती एक्सप्रेस धावणार, याकडे लक्ष असणार आहे.