सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीची लढाई आता ऊसाच्या दरावर येऊन पोहोचली आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि अभिजित पाटील यांच्या राजकीय संघर्षातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी स्थिती आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांच्या दराची स्पर्धा अधिकच तीव्र होण्याचे संकेत आहेत. दोन वर्षे बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करून गेल्या वर्षी अभिजीत पाटील यांनी १० लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्यांनी ३००० रुपये प्रती टन दर दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना अभिजीत पाटील यांच्या दराच्या जवळपास जावे लागले होते. यंदाही अशीच स्थिती असेल असे सांगण्यात येते.
यावर्षी अभिजीत पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी ३,५०० रुपये जाहीर करत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इतर साखर कारखानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे तालुक्यात साखर सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे राज्यात सर्वाधिक गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे. शिवाय विजय शुगर हा एक कारखाना आहे. गेल्या वर्षी जवळपास २५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप शिंदे केले होते. यावर्षी अभिजीत पाटील यांनी ३,५०० रुपये दर जाहीर केल्याने आमदार शिंदे यांची कोंडी झाली आहे. पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आमदार शिंदे यांनी अभिजीत पाटील यांच्यापेक्षा एक रुपया जास्त दर देण्याची घोषणा केली. त्यावर अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत जर इतरांनी एक रुपया जास्त दिला तर मी दोन रुपये जास्त देईन, सर्वाधीक दर विठ्ठल कारखान्याचा असेल अशी घोषणा केली आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.