उतरौला : इटई मैदा येथील साखर कारखान्यासमोर भारतीय किसान क्रांती युनियनने धरणे आंदोलन केल्यानंतर कारखान्याने गेल्या हंगामातील थकीत ऊस बिले अदा केली आहेत. चालू गळीत हंगामात खरेदी करण्यात आलेली एक कोटी २५ लाख रुपयांची बिलेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बलरामपूर ऊस समितीचे सचिव अविनाश सिंह यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, साखर कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे थकीत नाहीत. साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक संजीव शर्मा म्हणाले की, कारखाना चालू गळीत हंगामातील पैसे वेळेवर देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी यावेळी पाच मागण्यांचे निवेदन तहसीलदार अवधेश कुमार यांना दिले. यावेळी शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष भुपेंद्र श्रीवास्तव, जिल्हाध्यक्ष खलील शहा, भानू प्रताप सिंह, सतेंद्र दुबे, राजेश तिवारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.