सोलापूर : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (शिखर बँक) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वेणूनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची तीन साखर गोदामे सील केली. कारखान्याकडे थकीत असलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने कारवाईचे हे पाऊल उचलले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील हे कारखान्याचे चेअरमन आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तृळात चर्चा आहे.
दोन वर्षापूर्वी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कारखान्याचे सलग दोन गळीत हंगाम यशस्वी करून दाखविले. यंदा १० लाख ८५ हजार मे. टन उसाचे गाळप करण्यात यश आले. मात्र, पूर्वी शिखर बँकेकडून घेतलेले सुमारे ४३० कोटींहून अधिक कर्ज थकीत आहे. याबाबत सर्व संचालकांविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कारखान्याने पुणे येथील ‘डीआरटी’ कोर्टात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने जप्तीच्या कारवाईला २५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत संपताच शुक्रवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी तीन साखर गोदामे सील केली. बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांच्यासह पथकाने ही कार्यवाही केली. दरम्यान, गोदामात एक लाख पोती साखर आहे. ती विकून शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार होते. बँकेच्या कर्जाची परतफेड टप्प्याटप्प्याने करण्याची तयारी आहे. याबाबत लवकरच तोडगा काढू असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.