बीजिंग : चीनमध्ये पुढील दहा वर्षात साखरेच्या आयातीत सातत्याने वाढ होईल असे अनुमान चीनच्या कृषी आणि ग्रामीण विभाग मंत्रालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. सन २०३० पर्यंत साखरेची आयात ५.५२ मिलियन टनापर्यंत पोहोचू शकेल. त्याच्या वार्षिक वाढीचा वेग ५.८ टक्के इतका राहील.
चीनमधील साखरेची मागणी २०३० पर्यंत वार्षित ०.९ टक्के वाढून १६.४४ मिलियन टनावर पोहोचू शकेल. पुढील दहा वर्षात चीनमधील साखरेचे देशांतर्गत उत्पादन वाढून ११.३५ मिलियन टनपर्यंत पोहोचू शकेल.
बिजिंग ओरिएंट अॅग्रीबिझनेसचे वरिष्ठ विश्लेषक मा वेनफेंग यांच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण अमेरिका आणि भारताकडून साखरेची आयात केली जाते. चीनमध्ये साखरेचे देशांतर्गत उत्पादन स्थिर आहे. मात्र गेल्यावर्षीच्या सुरुवातीला आयात केल्या जाणाऱ्या साखरेवरील कर हटविण्यात आला आहे. आता साखरेच्या मार्केटमध्ये आयातीचा मोठा भाग असेल. मे २०२० मध्ये साखरेच्या आयातीवरील अतिरिक्त शुल्क हटविण्यात आले. हा कर ९५ टक्क्यांवरून घटवून ५० टक्क्यांवर आणण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तराच्या तुलनेत चीनमध्ये साखरेची किंमत अधिक असल्याचे वेनफेंग यांनी सांगितले. आयातीत वाढ झाल्याने स्थानिक साखर उत्पादक कंपन्यांना आपल्या उत्पादन तंत्रात आणि कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी दबाव निर्माण होणार आहे.