पुणे : साखर उद्योगाच्या विकासासाठी खर्चावर नियंत्रण हवे. यासाठी शुन्याधिष्ठित अर्थसंकल्प या तत्त्वाचा वापर करा. उत्पन्नाएवढाच खर्च अशी मर्यादा घाला. आपल्या कारखान्याचा नफा, तरलता, पतदारी याचा ताळमेळ बसवा असा सल्ला श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्यावतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ मध्ये बोलताना त्यांनी साखर उद्योगातील खर्च नियंत्रण आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी म्हणाले की, आपण कारखान्याच्या खर्चामध्ये उत्पादनाशी निगडीत बदलते खर्च आणि स्थिर खर्च असे दोन्ही घटक तपासले पाहिजेत. खर्च नियंत्रणासाठी फिनान्शियल टेक्निक वापराव्यात. काही खर्चनिहाय उपाययोजना करायला हव्यात. तोडणी वाहतूक, पगार व मजुरी, व्याज खर्च, देखभाल – दुरुस्ती खर्च. स्टँडर्ड कॉस्टिंग या सर्व बाबींचा साकल्याने विचार करा. एखाद्या कारखान्यात कर्मचारी पगार व मजुरी यासाठी प्रती मेट्रिक टन १७५ रुपये खर्च येत असेल आणि आपल्या कारखान्याचा खर्च २०० रुपये असेल तर हा खर्च वाढतो कसा याचा अभ्यास करा.
यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, ऑपरेशनल बजेट आणि फायनान्शिअल बजेट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारखान्याचा ऊस तोडणी व वाहतूक खर्च हा महत्त्वाचा असतो. काही कारखान्यांचा खर्च प्रती मेट्रिक टन ३५० ते ४५० रुपये तर काहींचा खर्च १००० ते ११०० रुपये असा प्रचंड असतो. कामगार भरती करताना ती अपुरी करणे टाळा. आधीच कर्मचारी भरती केली तर फक्त १८ – १९ टक्के कमिशन द्यायला लागते. अचानक भरले तर त्याच्या चारपट खर्च येतो. याशिवाय कारखान्याच्या तोडणी-वाहतूक खर्चाकडे दुर्लक्ष करू नका. तेथे व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवा. याशिवाय कारखान्यांनी खेळत्या भांडवलातून तोडणी – वाहतुकीला ॲडव्हान्स देऊ नये. यासाठी वैयक्तिक कर्ज निर्माण करून ॲडव्हान्स द्या.त्यातून जादा व्याजाचा भुर्दंड टाळता येईल.
यशवंत कुलकर्णी म्हणाले की, साखर कारखानदारीत पर्सनल ट्रॅकिंग आणि व्हेइकल ट्रॅकिंग या दोन्ही संकल्पना वापरा. आधुनिक तंत्राचा वापर करून खर्च कमी करता येईल. यासाठी कायम व हंगामी कामगार यांचा समतोल साधा. एचआरएम अर्थात ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट तत्त्व स्वीकारा. कारखान्यांकडून कर्जोपोटी दिले जाणारे व्याज प्रचंड असते. खरेतर साडेसात ते आठ टक्केपेक्षा जास्त व्याज कोणत्याही कारखान्याला परवडत नाही. त्यासाठी फायनान्शिअल प्लॅनिंग करा. साखर, वीज, इथेनॉल यांच्या विक्रीचे योग्य नियोजन तर व्याजावरील पैसे वाचवणे शक्य होईल. साखर कारखान्यांनी रिसायकल, रिड्यूस, रियूज हे तंत्र वापरले पाहिजे असे कुलकर्णी यांनी सांगितले.