संगमनेर : साखर उद्योग अडचणीतून जात असताना नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. साखरेपेक्षा जास्त म्हणजेचे इथेनॉलचा दर ५९ रुपये आहे. आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील ३५ साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात इथेनॉलचे उत्पादन दिशादर्शक ठरत आहे.त्यामुळे साखर उद्योगाने आता रसापासून इथेनॉल निर्मितीकडे वळले पाहिजे, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा गळीत हंगाम गुरुवारीपासून (२१ नोव्हेंबर) सुरू झाला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. ते पुढे म्हणाले, साखरेचा औद्योगिक वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. चॉकलेट व शीतपेयांच्या कंपन्या आता साखरेचा वापर टाळत आहेत व खर्चात बचत करीत आहेत. म्हणून चांगल्या साखर कारखान्यांना भेटी देण्याचा आपला उद्देश आहे, असे गायकवाड म्हणाले.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुंगरकर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने राज्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सरकारने पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी प्रादेशिक साखर संचालक डी. बी. मुकनिक, सहसंचालक बाजीराव शिंदे, अध्यक्ष माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे व सर्व संचालक उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.