नवी दिल्ली : चीनी मंडी
गेल्या महिनाभरात देशात साखरेच्या दरांत घसरण होत असली तरी, तुलनेत महाराष्ट्रातील साखरेच्या घाऊक बाजारात साखरेचे दर गेल्या दोन-तीन दिवसांत स्थिर आहेत. कारण, राज्यातील साखर कारखान्यांचे डोळे सरकार जाहीर करणार असलेल्या डिसेंबरच्या विक्री कोट्याकडे लागले आहेत. साखर व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईमध्ये मध्यम प्रतिच्या साखरेची मुंबईतील किंमत ३ हजार ३३५ रुपये क्विंटल (३३ रुपये ३५ पैसे प्रति किलो) आणि कोल्हापुरातील किंमत ३ हजार १६० रुपये प्रति क्विंटल (३१ रुपये ६० पैसे प्रति किलो) हे दर बुधवारपासून स्थिर आहेत.
साखर उद्योगातील प्रत्येकजण डिसेंबरच्या विक्री कोट्याच्या घोषणेची वाट पाहत आहे. जेव्हा कोट्याची घोषणा होईल, तेव्हाच साखरेच्या किमतींमध्ये चढ किंवा उतार पहायला मिळेल, अशी माहिती स्थानिक साखर व्यापाऱ्याने दिली.
देशांतर्गत बाजारातील साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण रहावे आणि किमती वाढण्याला संधी निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकारने स्थानिक बाजारांतील महिन्याच्या साखर विक्रीला मर्यादा घालून दिल्या. नोव्हेंबर महिन्यात सरकारने साखर कारखान्यांना देशांतर्गत बाजारात २२ लाख टन साखर विक्री करण्याची मर्यादा घालून दिली होती. त्याचबरोबर ज्या साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती होते. जेथे बी ग्रेड काकवीपासून इथेनॉल तयार केले जाते. त्यांना साखरेच्या निर्मिती ऐवजी इथेनॉल तयार केलेले असते. त्यामुळे त्यांना दिलेल्या कोट्या एवढीच अतिरिक्त साखर विक्री करण्याची मुभा सरकारने दिली आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील काही बाजारपेठांमध्ये साखरेच्या किमती किंचित घसरल्या आहेत. मोठे साखर खरेदीदार, साखर विक्रेते यांच्याकडून मागणी ठप्प असल्यामुळे हे दर घसरले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती घसरल्यामुळे कच्च्या साखरेचे भविष्यातील करार धोक्यात आले आहेत.
कच्च्या तेलाचे दर गेल्या तेरा महिन्यांतील निचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे तेलाच्या बाजारपेठेत अतिरिक्त पुरवठ्याची भीती वाटू लागली आहे. जगातील मोठ्या तेल उत्पादक देशांची पुढील आठवड्यात बैठक होणार असून, त्यात उत्पादन कमी करण्याच्या निर्णयाविषयी अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे इथेनॉल आणि उसाच्या इतर उपपदार्थांची मागणी कमी होणार आहे. त्यामुळे उत्पादक साखरेच्या उत्पादनाकडे वळतील आणि पुन्हा साखरेचा पुरवठा वाढून दर घसरतील, अशी भीती साखर उद्योगाला आहे. कारण, ब्राझील सारख्या देशांमधील साखर कारखान्यांकडे एकच वेळी इथेनॉल आणि साखर उत्पादन करण्याची सोय आहे.