पुणे : नॅच्युरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या साखर कारखान्याने महसुलाच्या नवनव्या संधी शोधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील या साखर कारखान्याने बायो सीएनजी उत्पादन करण्यासाठी प्रेस मडचा वापर केला आहे. आता कारखान्यातील वेस्टपासून (waste) ऊर्जा उत्पादन करण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाने कारखान्यांना शिल्लक राहिलेल्या कृषी अवशेषांचा वापर करण्यास मदत होईल. आतापर्यंत त्यांचा खताच्या रुपात वापर केला जात होता. उसाचा रस वारंवार गाळून प्रेस मड उत्पादीत होतो. त्याचा फिल्टर वेळोवेळी साफ केला जातो. आणि हे अवशेष कारखान्याच्या आवारात साठवले जातात. प्रती टन ऊसाच्या गाळपानंतर जवळपास ३ ते ४ टक्के प्रेस मड तयार होतो. सद्यस्थितीत कारखाने या प्रेस मडचा वापर खतांच्या स्वरुपात पुनर्वापर करुन आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरवतात.
दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ठोंबरे यांनी सांगितले की, या प्रक्रियेत प्रेस मडमधील BOD (biological oxygen demand) आणि COD (chemical oxygen demand) कमी करणे आणि नैसर्गिक गॅस द्रावणातून वेगळे करणे याचा समावेश असेल. तर उपलब्ध झालेला गॅस प्रेस करून बायो-सीएनजी म्हणून इंधन कंपनीला विकला जाईल. ठोंबरे यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाचा एक प्रायोगिक तत्त्वावरील प्लांट कोल्हापूरस्थित वारणा सहकारी साखर कारखान्यात सुरू करण्यात आला आहे. उस्मानाबादमधील प्लांटमध्ये १०० टन प्रेस मडचा वापर केला जाईल आणि त्यापासून ५-६ टन बायो सीएनजी उत्पादन होईल. हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनी (एचपी) कारखान्याकडून ७५ रुपये प्रती किलो दराने याची खरेदी करेल.