पंढरपूर: साखर कामगारांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रात सुमारे 450 कोटींचे वेतन थकीत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांचे वेतन गेल्या वर्षभरापासून थकीत आहे. हे वेतन महिन्याभऱात द्यावे, अन्यथा कारखाने बंद पाडू, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला.
सोलापूर येथील बाळकृष्ण मठात साखर कामगारांचा मेळावा पार पडला. यावेळी तात्यासाहेब काळे बोलत होते. याप्रसंगी कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राव पाटील, उपाध्यक्ष युवराज ननावरे, अशोक बिराजदार, खजिनदार रावसाहेब भोसले, नितीन बेणकर, संजय मोरवळे, प्रदीप शिंदे, आनंद वाईकर, सुरेश मोहिते, बंडू पवार, उदय पाटील, ज्ञानदेव पवार, विजय पाटील, मारुती मासाळ आदी उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले, थकीत वेतनामुळे साखर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आही. वेतन वाढीसंदर्भात त्रिपक्षीय समितीची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे. परंतु, अद्याप सरकारने ही समिती स्थापन केली नाही. सरकार साखर कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात वेळकाढूपणा करत आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात वेळ पडली तर सरकार आणि साखर कारखानादारांच्या विरोधात तीव्र आंदोंलन केले जाईल, असा सज्जड इशाराही काळे यांनी यावेळी दिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.