साखर कारखानदारांनी ऊस वाहतूकदारांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहावे : राजू शेट्टी

कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. , जिल्ह्यात ८७० फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल झाले आहेत. लाखो रुपयांच्या फसवणुकीमुळे अनेक ऊस वाहतूकदार देशोधडीला लागले आहेत. तरी साखर कारखानदारांनी ऊस वाहतूकदारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले तर एकाही वाहतूकदाराची फसवणूक होणार नाही, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

घुमडेवाडी येथे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडिबा पाटील होते. शेट्टी म्हणाले कि, ऊस वाहतूकदारांनी एकसंध राहण्याची गरज आहे. यापुढे कारखान्यांनी वाहतूकदारांच्या समस्या सोडवाव्यात; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

संघटितपणामुळे सरकारवर दबाव निर्माण होत आहे. यापुढे फसवणूक केलेल्या मुकादमांची जबाबदारी कारखान्यांवर राहिल, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. कायदेशीर कारवाई करून कारखान्यानेच ऊस तोडणी मजूर पुरवावेत, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, शिवाजी पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, गोपाळराव पाटील, संतोष मळवीकर, बाजू पेडणेकर, राजेंद्र गड्याण्णावर, शांताराम पाटील, आर. जी. पाटील, जगत्राय हुलजी, गोविंद पाटील यांच्यासह ऊस तोडणी-ओढणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here