हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
रायपूर (छत्तीसगड) : चीनी मंडी
छत्तीसगड मधील बालोद जिल्ह्यातील करकाभाठ येथील दंतेश्वरी मैय्या सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी, शेतकऱ्यांचे केवळ दीड कोटी रुपयेच भागवण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस बिल थकबाकी १४ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीलाच लाखो रुपये खर्च करून कारखान्यातील मशिन्सची दुरुस्ती करून घेतली होती. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे. कारण, अजूनही मशिन खराब होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे गाळपामध्ये अडथळा येत आहे. कारखान्यावर ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऊस घेऊन आलेले शेकडो ट्रक कारखान्याबाहेर गेल्या चार-पाच दिवसांपासून रांगेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारा जिल्ह्यातील करकाभाठ साखर कारखाना यंदा शेतकऱ्यांसाठी समस्या बनला आहे. सातत्याने मशीन्समध्ये खराबी होत असल्यामुळे ऊस गाळप बंद पडत आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊस तोड झाली आहे आणि शेतकरी कारखान्याकडे ऊस घेऊन येऊ लागले आहेत. दुसरीकडे अनेक ट्रॅक्टर आणि ट्रक कारखान्याबाहेर रांगेत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस शेतांमध्ये पडून आहे. त्याचबरोबर कारखान्याबाहेर खोळंबलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रकचे भाडेही शेतकऱ्यांच्या अंगावर पडत आहे.
कारखान्यात नियमांनुसार काम होत नसल्याचा आरोप केला जात आहे. काही ठराविक शेतकऱ्यांना टोकन दिले जात आहे. तर, पहिल्यापासूनच टोकन घेतलेले शेतकरी रांगेत उभे आहेत. कारखान्यातील मशिन्समध्ये बिघाड झाल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने मान्य केले आहे. तसेच त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून, मशिन्स पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी नव्या टिमला बोलवण्यात येत आहे. दरम्यान, कारखान्याच्या अनियमीत कारभारामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp