हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नंदूरबार : उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांची आणि साखर कारखानदारांची चिंता वाढली आहे. किडीमुळे ऊस उत्पादनात आणि परिणामी साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यात सातपुडा सहकारी साखर कारखान्याने याची गंभीर दखल घेतली असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. किडीचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. यासाठी औषध उपचारांनीच किडीचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातपुडा साखर कारखान्याने यात पुढाकार घेतला असून, लाईट ट्रॅप तसेच सापळे लावून हुमणीचे भुंगे पकडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी अजितकुमार सावंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हुमणी भुंगे आणि अळी अशा दोन्ही स्वरूपात दिसत आहे. अळी स्वरूपातील किडीसाठी मेटॅरायडिअम २०० रुपये लिटर अशा दराने उपलब्ध करून दिले आहे. एकरी २०० लीटर पाण्यातून त्याची फवारणी करायची आहे. याचे रितसर प्रशिक्षण देण्यात येत आहे. साखर कारखान्याच्या सभासदांनी या संदर्भात ऊस विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लागण केलेल्या उसाची जात, त्याचे क्षेत्र याची नोंदही कारखान्याकडे करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सभासदांनी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांचेशी संपर्क साधावा. तसेच गटनिहाय लागण हंगाम 2018-19 च्या ऊस नोंदीच्या याद्या गाववार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. याबाबत नोंद केलेल्या उसाची जात, क्षेत्रफळ व नोंदीची तारीख पडताळणी करून काही हरकत असल्यास गट कार्यालयात लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदवावी, असे आवाहनही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी केले आहे.