कोल्हापूर : आगामी साखर हंगामासाठी जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तालयाकडे ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. महापूर, अतिवृष्टी आणि साखर उद्योगात येणार्या अडचणी लक्षात घेवून गाळप परवाना देण्यासाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. ज्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेबर आहे. परवाना मिळवण्यासाठी एफआरपीचा नियम लावल्याने शिल्लक एफआरपी देण्यासाठी कोल्हापूर विभागातील सहा कारखान्यांची धडपड सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला महापूराने वेढले होते.
ऊसाचे खूप मोठे नुकसान या काळात झाल्यामुळे गाळप परवान्यास मुदतवाढ देण्यात आली. या परवान्याशिवाय कोणत्याही कारखान्यानला हंगाम सुरु करता येत नाही. 2018-19 या हंगामातील राज्यातील कारखान्यांकडून अद्याप 589 कोटी रुपये एफआरपी देय आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात वारणा, आजरा, गायकवाड आणि सांगली जिल्ह्यात केन शुगर, महाकाली, यशवंत, खानापूर या कारखान्यांची दहा ते पंधरा टक्के एफआरपी थकीत आहे.
यंदा राज्यातील 195 कारखान्यांनी 952.11 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. एकूण 107 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 195 पैकी 129 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. 49 कारखान्यांनी 80.99 टक्के एफआरपी तर 13 कारखान्यांनी 60.79 टक्के एफआरपी दिली आहे. चार कारखान्यांनी फक्त 49 टक्के एफआरपी दिली आहे. या कारखान्यांना पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय परवाना मिळणार नाही.
सध्या साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांकडून साखरेची विक्री सुरू झाली आहे. या रक्कमेतून एफआरपी दिली जात आहे. सांगली जिल्ह्यातील वसंतदादा कारखान्याने बांधून दिलेल्या हप्त्यातून एफआरपी दिली होती. त्यामुळे यंदा त्यांना गाळप परवाना मिळवताना अडचणी येणार नाहीत.
आगामी गळीत हंगामाच्या तयारीबाबत साखर आयुक्तांनी शुक्रवारी (ता. 20) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत थकीत एफआरपी, साखर उद्योगतील अडचणी आणि समस्यांवर चर्चा होणार आहे.