मुरादाबाद : शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळाली पाहिजेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे उशीर होता कामा नये. राज्य सरकारचे शेतकऱ्यांना प्राधान्य आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची उपेक्षा होऊ नये. ज्या कारखान्यांनी अद्याप ऊस बिले दिलेली नाहीत, त्यांनी ती तातडीने करावीत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऊस विभाग आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना पैसे देण्याची गती वाढवली पाहिजे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०२०-२१ या हंगामात एक लाख शेतकऱ्यांना सात अब्ज ३८ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. या हंगामात ३ कोटी ३५ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करून ३६ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. याशिवाय ३६ हजार हेक्टरमधील उसाचा सर्व्हे साखर कारखाना आणि ऊस विभागाने केला आहे. त्याची सातत्याने पडताळणी केली जात आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऊस बिलांची माहिती दिली. यावेळी ऑनलाइन घोषणापत्र भरण्यासाठी केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी रानी नागल कारखान्याचे व्ही. व्यंकटरमण, आझाद सिंह, बिलारीचे सुभाष खोखर, प्रवीण सिंह, धन सिंह आदी उपस्थित होते.