बरेली : ऊस गाळप हंगाम संपुष्टात येऊन दोन महीने झाले तरी राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवलेले नाहीत. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखर कारखान्यांना थकबाकी देण्याचे आदेश दिले होते. पण, त्याचा कारखान्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. राज्यात बजाज ग्रुपची गोला, पलिया, खंभारखेडा आणि झुआरी ग्रुपच्या ऐरा साखर कारखान्याची सर्वाधिक बिकट अवस्था आहे. शेतकऱ्यांची अब्जावधी रुपयांची थकबाकी असल्यामुळे त्यांच्या चितेंत भर पडत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी डोळे लावून बसले होते. त्यांच्या सांगण्याचाही परिणाम न झाल्याने शेतकऱ्यांची आता निराशा झाली आहे.
राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी मिळून १ हजार २२७.५५ लाख क्विंटल ऊस खेरदी केला होता. त्याचे ३९ अब्ज ४१ कोटी ४४ लाख रुपये शेतकऱ्यांना देय होते. त्यातील १५ अब्ज ६ कोटी ३१ लाख रुपये अद्याप थकीत आहेत. यातील सर्वाधिक रक्कम बजाज ग्रुपच्या गोला, पलिया आणि खंभारखेडा साखर कारखान्याची आहे. ऐरा कारखान्याकडे १२ अब्ज ६१ कोटी रुपये देय आहेत. यावर शेतकरी संघटनांचे आंदोलन आणि मागण्यांचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे न दिल्याप्रकरणी आता साखर कारखान्यांना कायद्यानुसार थकीत रकमेवरील व्याजही द्यावे लागणार आहे. सध्या साखर कारखान्यांवर थकीत रकमेचे ८४ कोटी ६९ लाख रुपये व्याज पडले आहे.
या संदर्भात जिल्हा ऊस अधिकारी ब्रिजेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी गोला, पलिया आणि खंभारखेडा कारखान्यातून ७.७५ कोटी रुपये भागवले आहेत. थकबाकी असलेल्या कारखान्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर न देणाऱ्यांना आता थकीत रकमेवरील व्याजही शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.