साखर कारखान्यांनी बाय प्रॉडक्ट्सवर भर द्यावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड : साखर कारखान्यांनी ऊसापासून साखरेसोबत इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. यासोबतच साखर कारखान्यांनी उप पदार्थांवर भर देण्याशिवाय तरणोपाय नाही असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आनंदगाव येथे येडेश्वरी साखर कारखान्यात डिस्टिलरीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर, संजय दौंड, येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पवार यांनी सांगितले की बीडसह दहा जिल्ह्यातील ऊस कामगारांच्या मुलांसाठी ४१ ठिकणी संत भगवान बाबा वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. पवार म्हणाले की, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व्यवस्थेसह शिक्षणाची सुविधा असेल. जोपर्यंत या विभागातील सर्व ऊस तोडला जात नाही, तोपर्यंत कारखाने बंद केले जाणार नाहीत. सरकार कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि नुकसान भरपाईसाठी मदत करेल. ज्या भागात ऊस तोडणी व्हायची आहे, तेथे हार्वेस्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले की, पाण्याच्या उपलब्धतेनुसार ऊसाची शेती केली पाहिजे. बिड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिली. सरकारने कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. सरकारने पायाभूत सुविधांसाठी १.२५ लाख कोटी रुपये मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here