नाशिक : साखर कारखान्यांना व्यवहार्य आणि नफा मिळविण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले. साखर कारखान्यांनी साखरेशिवाय वीज, इथेनॉल आणि हायड्रोजन उत्पादन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करताना पवार म्हणाले, आव्हानांचा सामना करत नाशिकमधील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. आपण सत्तेमध्ये नसलो तरी, आम्ही शेतकऱ्यांप्रती आपले उत्तरदायित्व ठेवले पाहिजे. आपले जीवन नेहमीच सर्वोत्तम बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात चांगल्या सुधारणा आणण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी जोर दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार यांनी स्थानिक नेते कडवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा सत्कार केला. पंच्याहत्तरीनिमित्त हा सत्कार करण्यात आला. दरम्यान नाशिक सहकारी साखर कारखाना (नीसाका) कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. पवार यांनी या मुद्याकडे लक्ष देऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.