कोल्हापूर : साखर कारखान्यांनी अनावश्यक खर्च टाळून उपपदार्थ निर्मितीद्वारे उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. चालू गळीत हंगामासाठी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने ९ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यंदाच्या ऊस टंचाईच्या परिस्थितीमध्ये सभासद शेतकऱ्यांनी इतरत्र ऊस न पाठवता पिकवलेला ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभी ते बोलत होते. घाटगे यांच्यासह सर्व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला. यावेळी गव्हाण पूजन संचालक वीरकुमार पाटील व त्यांच्या पत्नी आशाराणी पाटील यांच्या हस्ते झाले. संचालक सतीश पाटील व त्यांच्या पत्नी मंगल पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा झाली. काटा पूजन संचालिका सुजाता तोरस्कर व रंगराव तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. घाटगे म्हणाले, पूर्वी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम १८० दिवसांपर्यंत चालायचे. दिवसेंदिवस कालावधी कमी होऊन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आता १०० दिवसांपर्यंत चालत आहेत. त्यासाठी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमात व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी . स्वागत केले. ज्येष्ठ संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.