कोल्हापूर, ता. 26 : महापुरात बाधित झालेला ऊस साखर कारखान्यांनी 3 आठवड्यात गाळप होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात बाधित झालेला ऊस प्राधान्याने नेण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रादेशिक सहसंचालक एस.एन. जाधव, दत्त शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, बिद्री येथील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्यासह 14 सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापकीय संचालक तसेच शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. प्रामुख्याने शिरोळ तालुक्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखान्यांनी बाधित ऊस 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवता येणार नाही. तो 3 आठवड्यातच गाळप होईल याबाबत नियोजन करावे. ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत तेथे कारखान्यांनी मुरूमाने रस्ते तयार करावेत. यासाठी संबंधित तहसिलदार यांना रॉयल्टी माफ करण्याबाबत कळविण्यात येईल.
गेल्या गळीत हंगामात उसाची एफआरपीची रक्कम विलंबाने दिली गेली. या काळातील 15 टक्के व्याजाची मागणी होती. ही रक्कम देण्याबाबत संबंधित कारखान्यांनी आठवड्यात अहवाल सादर करावा. आठवड्यामध्ये अहवाल प्राप्त न झाल्यास रक्कम निश्चित करून सहकार आयुक्तांकडे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने पत्र पाठवावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज दिल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.