हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सोलापूर : चीन मंडी
शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे थकविल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यातील दोन साखर कारखान्यांची पाच लाख पोती साखर जप्तही करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १९३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात जयहिंद शुगर (५ कोटी ८२ लाख), गोकूळ शुगर (९ कोटी ६४ लाख), सिद्धेश्वर साखर कारखाना (३९ कोटी ४० लाख), विठ्ठल रिफाईन्ड शुगर (३९ कोटी ४० लाख), बबनराव शिंदे शुगर (४२ कोटी १५ लाख), मकाई (१२ कोटी १८ लाख), विठ्ठल कार्पोरेशन (२९ कोटी २ लाख) आणि फॅबटेक शुगर (१५ कोटी ५५ लाख) या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
साखर आयुक्तांनी या कारखान्यांकडून रेव्हेन्यू अँड रिकव्हरी सर्टिफिकेशन अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संत कुर्मदास साखर कारखान्यातील १४ कोटी रुपयांच्या साखरेची जप्ती करण्यात आली असून, या साखरेची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यात येत आहेत. जवळपास १४ कोटी १९ लाख रुपयांची बिलेदेखील भागवण्यात आली आहेत.
जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे मिळण्याबाबत अतिशय गंभीर असून, त्यासाठी कारखान्यांकडे पाठपुरवा करण्यात आला आहे. त्यांना वारंवार नोटिस पाठवून एफआरपीचे पैसे भागवण्या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिंदे बंधूंच्या कारखान्यांवर कारवाई
जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या मालकीच्या विठ्ठल रिफाईन्ड शुगर आणि विठ्ठल कार्पोरेशन या कारखान्यांकडून मिळून पाच लाख साखर पोती जप्त करण्यात आली आहेत. आरआरसी अंतर्गत कारवाई करताना सोलापूर विभागीय साखर सहसंचालक कार्यालयातील ऑडिटर्सची बैठक घेण्यात आली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत आणि ज्यांनी ते पैसे दिल्याचा दावा केला आहे. अशा कारखान्यांची सगळी बँक खाती तपासण्याचा आदेश निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिला आहे.