कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची २२ वी ऊस परिषद विक्रमी होणार आहे. मागील हंगामातील ४०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही. साखर कारखान्यांनी पगारी बाऊन्सर आणून ऊस नेण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी दिला. जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
सावकार मादनाईक म्हणाले की, ऊस परिषदेची जय्यत तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वगळता सर्वत्र ऊसतोडी बंद आहेत. काही साखर कारखाने पगारी बाऊन्सर घेऊन उसाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रकार केल्यास त्यांनाच चोप देण्यात येईल. आम्ही घामाचे पैसे मागत आहोत. आमच्यावरच गुंड सोडत असाल, तर आम्ही कुणालाही सोडणार नाही.
मादनाईक यांनी सांगितले की, उद्या, ७ नोव्हेंबर रोजी येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २२ वी ऊस परिषद होईल. नांदणी येथून सकाळी १० वाजता राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा जयसिंगपूरकडे मार्गस्थ होणार आहे. ऊस परिषदेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. विक्रमसिंह मैदानावर स्क्रीनची व्यवस्था केली असून सिद्धेश्वर मंदिर, दसरा चौक, प्राथमिक, आरोग्य केंद्र परिसर आदी ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, विठ्ठल मोरे, आण्णासो चौगुले, शैलेश आडके, सागर संभुशेटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.