मजुरांअभावी साखर कारखाने हतबल, तोडणी वेळापत्रक कोलमडले

कोल्हापूर : कमी उसतोड मजुरांमुळे साखर कारखाने हतबल झाले आहेत. यामुळे गाळप हंगाम लांबत चालल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकऱ्यांनीच कोयता हातात घेऊन ऊस तोडीला सुरुवात केली आहे. मात्र, तोडणी मजुरांचे खुशालीचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आहे. फेब्रुवारीपर्यंत गळीत हंगाम संपेल, असे वाटत असतानाच उत्पादन वाढ, उपलब्ध तोकडी तोडणी मजूर यंत्रणा यामुळे कारखाने मेटाकुटीस आले आहेत. तुटपुंज्या मजुरीवर ऊस तोडणीचे काम सुरू आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांची कसरत सुरू आहे.

सद्यस्थितीत टोळीकडून खुशालीचे दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे ठरत आहेत. टोळीच्या अवास्तव मागणीने शेतकरी हतबल आहेत. मजुरांअभावी ऊस तोडणी यंत्रणा कोलमडल्यामुळे शेतकऱ्याला स्वतः चा ऊस स्वतः तोडण्याची वेळ आली आहे. तोडणी आणि वाहतुकीचे पैसे मात्र शेतकऱ्याला मिळत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तोडणीसाठी रस्त्याची अडचण, पाण्याची अडचण यासह अनेक अडचणींत सापडलेल्या शेतकऱ्यांना तोडणी यंत्रणेकडून तुम्ही तोडून तयार ठेवा आम्ही भरून नेतो, अशी ऑफर दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडत आहे. उशीरा तोडणीचा पुढील पिकावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पिकवलेला ऊस साखर कारखान्याला तोडून पाठवणे डोईजड व फार मोठे अवघड असल्यासारखे शेतकऱ्याला वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here