सोलापूर : शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या कमरळा तालुक्यातील मकाई आणि कमलाई या साखर कारखान्यांविरोधात जनशक्ती संघटनेने पुण्यातील साखर संकुलात आंदोलन केले. दोन्ही कारखान्यांनी गळीत हंगाम संपून आठ महिने उलटले तरी बिले दिलेली नाहीत. या आंदोलनानंतर साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बिले थकीत ठेवणाऱ्या कारखान्यांना यंदा गाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या आंदोलनानंतर मकाई व कमलाई साखर कारखान्यांनी आगामी सात दिवसांत ५० टक्के थकीत बिले देऊ असे आश्वासन दिल्याची माहिती जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिली. ३० सप्टेंबरअखेर सर्व बिले देण्याचे कारखान्यांनी मान्य केल्याचे ते म्हणाले. यावेळी विनिता बर्फे, शर्मिला नलवडे, गणेश वायभासे, राणा वाघमारे, अनिल शेळके, अतुल राऊत, शरद एकाड, बिभीषण शिरसाट, दीपाली डिर आदी उपस्थित होते.