हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नगर : भारतीय बाजारपेठेत साखरेला मागणीच नसल्यामुळे कारखान्यांच्या साखरेला उठाव नाही. परिणामी नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ११ लाख ५८ हजार टन साखर पडून आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनही चांगले होत असल्याने हंगामाच्या अंतिम टप्प्यातील उत्पादनाची त्यात भर पडणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत साखरेचे गोदामे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आता साखर ठेवायची कोठे, असा प्रश्न पडला आहे.
भारतीय बाजारातून साखरेला मागणी कमी आहे. मागणी कमी असल्यामुळे दर कोसळण्याची शक्यता असते. दर आणखी पडू नयेत म्हणून सरकारने ठरवून दिलेल्या साखर कोट्यानुसार साखर कारखान्यांना विक्री करायची आहे. कोट्यापेक्षा जास्त विक्री करून साखर बाहेर काढणे, कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे गोदामांमध्ये साखर पडून आहे.
गेल्या साखर हंगामात नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांनी १५ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या वर्षी तयार साखरेपैकी २५ टक्के साठा शिल्लक राहिला. साखरविक्री होऊन यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच ४ लाख ३० हजार टन साखर शिल्लक राहिली होती.
नगर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू झाला. साखर उत्पादन वेगाने होत आहे. गेल्या आणि चालू हंगामातील आतापर्यंत ४ लाख ५६ हजार टन साखरेची विक्री झाली असून, तब्बल ११ लाख ५८ हजार टन साखर विक्रीविना पडून आहे.
साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या अंबालिका या खासगी कारखान्याकडे सर्वाधिक साखरसाठा शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात उत्पादित साखरेपैकी ७० टक्के साखर ही विक्रीविना आहे. जिल्ह्यात गाळप हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यामुळे साखरेच्या साठ्यामध्ये भर पडणार आहे.
कारखाना साखरसाठा (टनांमध्ये)
अंबालिका-१ लाख ५१ हजार
ज्ञानेश्वर-९८ हजार ८३०
मुळा-९५ हजार ९९२
संगमनेर-८८ हजार ९५५
प्रवरा-८६ हजार १४८
कुकडी-६६ हजार ३६१
श्रीगोंदा-५७ हजार ८०७
अगस्ती-४१ हजार १४०
गंगामाई-३४ हजार ८८५
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp