नवी दिल्ली : चीनी मंडी
केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसाठी जाहीर केलेल्या विक्री कोट्याचा उलटा परिणाम साखर उद्योगावर होईल, अशी चिंता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जास्त विक्री कोट्यामुळे सरकारने यापूर्वी घेतलेल्या चांगल्या निर्णायांवर विपरीत परिणाम होईल, असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अबिनाश वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती घसरणीला लागल्या आहेत. सरकारच्या काही सकारात्मक निर्णयांमुळे साखर उद्योगाला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा असताना पुन्हा साखर उद्योग संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारने मार्च महिन्याचा कोटा (२४.५ लाख टन) जाहीर केल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत साखरेचे दर तीन टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे साखर उद्योगाची चिंता वाढली आहे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने जानेवारी महिन्यासाठी १८.५ लाख टन तर, फेब्रुवारी महिन्यासाठी २१ लाख टन साखर विक्री कोटा जाहीर केला होता. पण, मार्च महिन्यासाठी आजवरचा सर्वाधिक २४.५ लाख टन कोटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे बाजारात साखरेचे दर घसरल्याचे दिसत आहे. यावर इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अबिनाश वर्मा म्हणाले, ‘मार्च महिन्यात केंद्र सरकारने आजवरचा सर्वाधिक विक्री कोटा जाहीर केला. त्यामुळे साखरेच्या किमती एक रुपयांनी घसरल्या आहेत. त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर आणि सरकारने यापूर्वी साखर उद्योगासाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयांवर होणार आहे.’
या परिस्थितीतही धामपूर, दालमिया भारत शुगर, बलरामपूर आणि त्रिवेणी इंजिनीअरिंग या चार साखर कारखान्यांच्या शेअर्समध्ये गेल्या ५२ आठवड्यांतील उच्चांकी दरांवर आहेत. नवी मुंबईतील वाशीच्या होलसेल बाजारात साखरेचा दर एक रुपयांनी घसरून ३२.८० रुपये प्रति किलोवर आला आहे. बाजारातील अतिरिक्त पुरवठ्याचा परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होताना दिसेल. साखर कारखान्यांमध्ये कॅश फ्लो वाढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यांच्या खात्यात ५ हजार कोटी रुपये पडावेत या उद्देशानेच सरकारने फेब्रुवारी महिन्यात साखरेच्या किमान विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली होती. केंद्र सरकारने बेल आऊट पॅकेजच्या माध्यमातून साखर उद्योगाला अनेक सवलती दिल्या आहे. सरकारने गेल्याच महिन्यात साखरेचा किमान विक्री दर दोन रुपयांनी वाढवून ३१ रुपये केला.त्याचा फारसा फायदा साखर कारखान्यांना होत नसल्याचे दिसत आहे. सध्या देशात एकूण साखर साठा १७० लाख टनापर्यंत पोहोचला असून, त्यात आणखी ७० लाख टनांची भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp