कोल्हापूर, दि. 21 जून 2018: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 8 हजार 500 कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे आणि 2900 रुपयांपेक्षा कमी किमतीने प्रति क्विंटल साखर विक्री करू नये, या निर्णयामुळे साखर उद्योगांमध्ये तेजी आली होती. दरम्यान प्रत्येक साखर कारखान्यांनी महिन्याला जास्तीत जास्त किती साखर विक्री करावी याचा कोटा हे ठरवून दिला आहे. मात्र पॅकेज जाहीर झाल्यानंतर काही दिवस प्रतिक्विंटल साखरेला तीनशे ते चारशे रुपयांची दरवाढ मिळाली, आता मात्र साखर दरामध्ये प्रति क्विंटल मागे 40 रुपयांची घसरण सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा हा चिंतेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार सध्या 2900 रूपये पेक्षा कमी किमतीने साखर विक्री होत नाही. पॅकेज जाहीर झाल्यानंतर प्रतिक्विंटल साखरेचा दर 3200 ते 3300 रुपये मिळाला. भविष्यातही असाच दर किंवा यापेक्षाही जास्त दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांचा लवकरच अपेक्षाभंग होतो की काय असे चित्र बाजारामध्ये निर्माण झालेले आहे. तरीही ज्या दराने साखर विक्री झाली त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जून महिन्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एफ.आर.पी. चे रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने प्रतिक्विंटल ऊसा मागे 400 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित साखर कारखाने जून महिन्यात अखेर एफ.आर.पी. ची रक्कम जमा करतील असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एफ.आर.पी. चे 170 कोटी रुपये जून महिन्या अखेर देण्याची घोषणा केली आहे. उर्वरित साखर कारखाने आपल्या याद्या तयार करण्यामध्ये गुंतले आहेत मात्र कोल्हापूर व्यतिरिक्त इतर साखर कारखान्यांमध्ये याबाबत कोणतीही हालचाल सध्या तरी दिसून येत नाही यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. साखर उद्योगाच्या धोरण प्रक्रियेबाबत घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयाचे परिणाम साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना भोगावी लागत आहेत. सरकारने पॅकेज देण्याचा किंवा साखर विक्री दराचा घेतलेला निर्णय योग्य असला तरीही यातून साखर उद्योग सावरेल असे म्हणता येत नाही. आज साखरेचे दर ही 40 ते 50 रुपये प्रतिक्विंटलने कमी होत आहेत त्याचा थेट फटका साखर कारखान्यांना बसत आहे.