कारखान्यांना दिलासा : उसाचे बिल देण्यास मदत
कोल्हापूर, 2 जून 2018 : साखर दराच्या घसरणीमुळे हैराण झालेल्या कारखानदारांना खूषखबर आहे. साखरेची मागणी वाढत असल्याने दरातही तेजी येत आहे. याच तेजीमूळे प्रतिक्विंटल साखर दरात 125 ते 150 रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे, त्यानूसार बॅंकांनीही प्रतिक्विंटल साखर मूल्यांकनात 125 रुपयांची वाढ केली आहे. मूल्यांकन 2575 ते 2700 रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात म्हणजेच नोव्हेंबर 2017 पासून घाऊक बाजारात साखरेच्या दराचा निचांक सुरू झाला. नोव्हेंबरमध्ये 3550 ते 3560 रुपयाने असणारे साखरेच दर 2400 ते 2450 पर्यंत खाली आले. एका महिन्यातच तब्बल 1000 ते 1100 रुपयाने दर कमी झाला. त्यामुळे साखरेचे मूल्यांकनही तेवढ्याच पटीने कमी झाले. साखरेच्या दरात वारंवार होणाऱ्या कपातीमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकनेही तब्बल आठ ते नऊ वेळा मुल्यांकनामध्ये कपात केली. यामुळे साखर कारखानदारांची झोप उडाली. एकीकडे एफआरपीची रक्कम द्यायची होती तर दुसरीकडे बाजारातील साखरेचे दर आणि कमी दरामुळे घटणारे मुल्यांकन या विवेंचनेचा कारखान्यांना सामना करावा लागला. दरम्यान, साखरेच्या दराबाबत रविवारी (दि.3) राज्य शासन व बुधवारी (दि. 6) केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे.
आता मात्र दरात तेजी येत असल्याने मुल्यांकनही वाढले आहे. याचा कारखान्यांना निश्चित फायदा होणार आहे. वाढलेल्या मुल्यांकातून 85 टेक्क रक्कम प्रक्रिया खर्चासाठी 250 रुपये व बॅंक कर्जासाठी 500 रुपये वजा करून उर्वरित उसाच्या बिले दिले जाणार आहे. यामध्ये मुल्यांकन वाढल्याने उसाचा दर देण्यासही मदत होणार आहे.