बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
आगामी २०१९-२० या वर्षी जागतिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यामुळे यंदा साखरेचे दर वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जगातील साखर उद्योगातील विश्लेषक आणि व्यापाऱ्यांच्या मतांचे विश्लेषण करून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रति पाऊंड १४.६० सेट्स या दराने यंदाच्या साखर हंगामाचा शेवट होण्याची शक्यता आहे. तर, यंदा शुद्ध प्रक्रियायुक्त साखरेचे दर ३१९.५० डॉलर प्रति टन राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी साखरेच्या जागतिक बाजारपेठेत २५ लाख ५० हजार टन साखर अतिरिक्त आहे. तुलनेत पुढच्या (२०१९-२०) हंगामात बाजारपेठेत १९ लाख टन साखरेचा तुटवडा जाणवण्याची चिन्हे आहेत.
भारतात यावर्षी सुमारे ३२० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असताना पुढच्या हंगामात देशात २९५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारतात साखरेचा पुरवठा वाढत आहे. निर्यातीला संधी असली तरी त्याचा जागतिक बाजारातील साखरेच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे ब्राझीलच्या बाजारपेठेचा परिणाम मात्र साखरेच्या दरांवर होताना दिसत आहे.
या वर्षी साखरेच्या किमती घसरल्यामुळे ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास उद्युक्त केले. जर, २०१९-२० या हंगामात जागतिक बाजारात ५० लाख टनापर्यंत साखरेचा तुटवडा जाणवला तर, निश्चितच साखरेच्या किमतीवर त्याचा मोठा परिणाम होईल. पण, साखरेचा तुटवडा खूपच कमी असेल, तर साखरेच्या किमतीही अतिशय नगण्य वाढतील, असे मत साखर उद्योगातील एका तज्ज्ञाने व्यक्त केले.
दरम्यान, युरोपमधील बिटाची पेरणी मर्यादित असल्यामुळे २०१९च्या हंगामात शुद्ध प्रक्रियायुक्त साखरेच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनने २०१७मध्ये उत्पादनाचा आणि निर्यातीचा कोटा रद्द केला आहे. त्यामुळे युरोपमधील अनेक साखर उत्पादकांनी उत्पादन वाढवले होते. पण, त्याचवेळी जागतिक बाजारात साखर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली.
सध्या युरोपमधील साखर उत्पादक कंपन्यांनी आता उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात कॅपिटल इकॉनॉमिस्ट आणि अॅनालिस्ट कारोलाईन बेन म्हणाले, ‘ब्राझीलमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आल्याने बाजारपेठेतील साखरेच्या किंमती सावरण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे युरोपमधील शेतकरी बिटाऐवजी इतर नगदी पिकांचा पर्याय निवडत असल्याचे दिसत आहे.’ त्याचवेळी ब्राझीलचे चलन रिअलची घसरण आणि भारतातील बंपर साखर उत्पादनाचा परिणाम जगभरात साखरेच्या किमतींवर होताना दिसत असून, किमती मर्यादित राहत अससल्याचे मत बेल यांनी व्यक्त केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp