नवी दिल्ली : मंगळवारी साखरेच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होवून त्या गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. भारताने अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या साखर उत्पादनामुळे यावर्षी अतिरिक्त निर्यातीस परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. याबाबत केंद्रीय अन्न सचिवांनी आपले धोरण स्पष्ट केल्यानंतर जागतिक पुरवठ्यातील तूट आणखी वाढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी मे NY जागतिक साखरेच्या दरात ३.४४ टक्के तर मे लंडन पांढऱ्या साखरेच्या दरात ४.३५ टक्के वाढ झाली.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये भारताने ११.२ मिलियन मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र, २०२२-२३ मध्ये केवळ ६ मिलियन मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. साखर निर्यातील वार्षिक आधारावर ४६ टक्क्यांची कपात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने बुधवारी भारताचे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील साखर उत्पादन वार्षिक आधारावर ३.३ टक्क्यांनी खालावून २९.९६ मिलियन मेट्रिक टनावर आल्याचे स्पष्ट केले.
येत्या शुक्रवारी मे लंडन व्हाईट शुगर कॉन्ट्रॅक्टची मुदत संपण्यापूर्वी डिलिव्हरी करण्यायोग्य साखरेची उपलब्धता कमी दिसून येत असल्यानेदेखील लंडन शुगर फ्युचर्सला अधिक चालना मिळत आहे. त्यामुळेच लंडन शुगर फ्युचर्समधील ओपन इंटरेस्ट ८,८०,००० एमटीवर पोहोचला. ब्राझिलियन रिअलनेही साखरेच्या किमतींना आधार दिला आहे. त्यामुळे मंगळवारी किमतींमध्ये वाढ झाली. टॉपिकल रिसर्च सर्व्हिसने २८ मार्च रोजी आपल्या आधीच्या ४.५ एमएमटी या जागतिक साखर अनुमानात १.६ एमएमटीची घट दर्शवली आहे. एसअँडपी ग्लोबल कमोडिटी इनसाईट्सने देखील गेल्या मंगळवारी २०२२-२३ च्या जागतिक साखर उत्पादनाचा अंदाज ६ लाख मेट्रिक टनाने कमी केला आहे. आधी उत्पादन ५ एमएमटी होण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले होते.
जागतिक साखर उत्पादनावर बदलत्या हवामानाचा परिणाम होण्याच्या शक्यतेने साखरेच्या वाढत्या दराला बळ मिळाले आहे. यूएस क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या उत्तरार्धात एल निनो पॅटर्न विकसित होण्याची शक्यता ६१ टक्के आहे. तसे झाल्यास ब्राझीलमध्ये अतिवृष्टी आणि भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होवू शकते. त्याचा साखरेच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम दिसून येईल. यापूर्वी २०१५ आणि २०१६ मध्ये एल निनोमुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला होता. याशिवाय यंदा भारतातील साखर उत्पादनानेही चिंता वाढवली आहे. इस्माने ३१ मार्च रोजी आपला २०२२-२३ मधील साखर उत्पादनाचे अनुमान ३६.५ एमएमटी या ऑक्टोबरमधील अनुमानावरून ३४ एमएमटीवर आणले आहे. साखर निर्यातेचे अनुमान ९ एमएमटीवरुन ६.१ एमएमटीवर आले आहे.