नवी दिल्ली : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेसाठी २०१८ची वर्षाअखेर कडूच राहिली. इंटर कॉन्टिनेंटल एक्स्चेंजमध्ये (आयसीई) न्यूयॉर्कच्या कच्च्या साखरेचा दर आणि लंडनच्या शुद्ध प्रक्रियायुक्त साखरेचा दर गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर राहिला. सोमवारी बाजारात २००८ नंतर साखरेला सर्वांत कमी दर मिळाला. अतिरिक्त उत्पादनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेच्या बाजारपेठेला फटका बसला आहे.
कच्ची साखर प्रति बॅग १२.०३ सेंट्सवर क्लोज झाली. वर्षाभरातील साखरेची ही घसरण एकूण २०.६ टक्क्यांची आहे. तर, शुद्ध साखरेचा दर प्रति टन ३३२.५० डॉलर राहिला. यात साखरेची घसरण १५.८ टक्क्यांची झाली आहे.
जगभरातून साखरेचा पुरवठा वाढल्याने त्याच्या किमतीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापाऱ्यांनी भारतातून आणखी जादा साखर पुरवठ्याची शक्यता व्यक्त केली असून, भारत ब्राझीलला मागे टाकून जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतात सप्टेंबरमध्ये नव्या निर्यात अनुदानामुळे जागतिक बाजारात साखरेचा पुरवठा वाढेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. या अनुदानामुळे कच्च्या साखरेचा दर ९.८३ सेंट्स प्रति बॅग गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर गेला होता.