नवी दिल्ली : चीनी मंडी
देशांतर्गत बाजारातील विक्रीसाठी सरकारने जाहीर केलेला अतिरिक्त कोटा आणि नव्या हंगामात सुरू झालेले साखर उत्पादन याचा परिणाम साखरेच्या दरांवर होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्यातही देशातील बाजारात साखरेच्या दरांची घसरण सुरूच राहिली आहे. अतिरिक्त पुरवठ्यामुळेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून साखरेचे दर खाली येत असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे. देशात १५ नोव्हेंबरपर्यंत २०१७-१८ च्या साखर हंगामातील शेतकऱ्यांची १० हजार कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याचेही ‘इस्मा’ने सांगितले आहे.
बाजारात अतिरिक्त साखर येण्यामागे दोन काही प्रमुख कारणे असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. यात प्रामुख्याने सरकारने देशांतर्गत बाजारासाठी कारखान्यांना २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला होता. जो गेल्या काही वर्षांतील कोट्यापेक्षा चार ते पाच लाख टनांनी जास्त होता. मुळात नोव्हेंबर महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर साखर बाजारात आणण्याचे कारण नव्हते. कारण, दिवाळी आणि भाऊ बीज या व्यतिरिक्त कोणतेही मोठे सण या महिन्यांत नव्हते. त्याचबरोबर या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई लागते. पण, त्यासाठी मिठाई तयार करणाऱ्यांची तयारी ऑक्टोबर महिन्यातच झाली होती आणि त्यासाठी त्यांनी त्याच महिन्यात साखर खरेदीही केली होती. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या २२ लाख टन कोट्याचा परिणाम बाजारातील दरांवर दिसला. त्याचबरोबर कमी किमतीला माल विकण्यासाठी सरकारकडून कारखान्यांवर दबावही टाकण्यात आला.
साखरेच्या किमती घसरण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, देशातील काही साखर कारखान्यांनी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ऊस गाळप सुरू केले. त्यामुळे त्या कारखान्यांना त्यांचा शिल्लक साठा बाजारात आणावा लागला. पण, ज्यावेळी बाजारात नवी साखर येण्यास सुरुवात होते. त्यावेळी जुन्या साखरेचे दर कोसळतात, हे यापूर्वीही पहायला मिळाले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमीळनाडू सारख्या राज्यांमध्ये सर्वत्र साखरेचे दर १ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात घसरले आहेत. ही घसरण साधारण १०० ते ३०० क्विंटल प्रति टन आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने महागाई निर्देशांका संदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ऑक्टोबर महिन्यात साखरेचा महागाई निर्देशांक ११.२० टक्क्यांनी घसरला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात तो १२.९१ टक्क्यांनी घसरला होता. यातील आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात किरकोळ बाजारातील साखरेच्या दरात ७.६४ टक्क्यांनी घसरण झाली असून, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये साखरेचे दर १.२ टक्क्यांनी आणखी खाली आले आहेत.