मुंबई : चीनी मंडी
साखरेच्या दराची घसरण थांबण्याची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. सणासुदीच्या दिवसांनंतर तर ही घसरण वेगाने होत आहे. देशात साखर कारखान्यांमधील साखरेच्या किमतीमध्ये गेल्या महिन्याभरात ५.५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसते. देशातील काही भागांत तर, सरकारने जाहीर केलेल्या किमान विक्री किमतीवर (एमएसपी) म्हणजेच २९ रुपयांवर साखरेचा व्यापार केला जात आहे.
महाराष्ट्रातही काही वेगळे चित्र नाही. मागणी कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात या आठवड्यात एस-३० साखरेची किंमत २९ रुपये प्रति किलोपर्यंत घसरली आहे. दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळानंतर मोठ्या प्रमाणावर साखरेची किंमत घसरत असल्याचे एका ज्येष्ठ साखर व्यापाऱ्याने सांगितले.
दिल्लीच्या बाजारात एनसीडीईएक्स साखरेची किंमत ४ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या महिन्याभरात साखरेची किंमत ३१.१५ रुपये प्रति किलोवर आली आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरातही साखरेची स्पॉट प्राइस ५.५ टक्क्यांनी घसरली आहे. २९ ऑक्टोबरला साखरेची किंमत ३०.२७ रुपये होती. तर ती आता २९ रुपयांवर आली आहे.
साखरेचा जास्त वापर करून तयार केले जाणारे आईस्क्रीम आणि कोल्डिंक्स यांच्या मागणीमध्ये हिवाळ्यात मोठी घसरण होते. त्यामुळे या काळात साखरेची मागणी घटते, अशी माहिती व्यापारी देतात. त्याचबरोबर साखरेच्या निर्यातीचा वेग मंदावल्यामुळेही देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती घसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाच्या हंगामात भारताने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले असले तरी, सध्या शुद्ध साखरेच्या निर्यातीचा वेग अतिशय मंदावला आहे. साखर कारखान्यांनी पांढऱ्या शुद्ध साखरेऐवजी कच्च्या साखरेच्या निर्यातीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भारतात या हंगामात चांगले साखर उत्पादन होणार असले तरी, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सुरुवातीला व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये ११.२६ टक्क्यांची घट दाखवली आहे. असोसिएशनच्या अंदाजानुसार भारतात या हंगामात ३१५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेची एकूण गरज २५५ ते २६० लाख टन आहे. तर, २०१७-१८च्या हंगामात भारतातत २२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
दरम्यान, साखरेचे उत्पादन घटण्याची भीतीही अनेक साखर कारखान्यांना आहे. तसेच साखर कारखान्यांची साखर बँकांकडे गहाण असून, कमी दरात त्याची विक्री करण्यास बँका तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने निर्यातीचे करार करण्यास पुढे येत नसल्याचे एका साखर उद्योगातील तज्ज्ञाने सांगितले. त्यामुळे आता भारत सरकार इतर कोणत्या देशाशी थेट साखर निर्यात करार करतो, याकडे साखर उद्योगाचे डोळे लागले आहेत. विशेषतः चीन, इंडोनेशिया, मलेशिया यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेकडून सगळ्यांना मोठी आशा आहेत.