पाकिस्तानमध्ये महागाईने मोडले जनतेचे कंबरडे, रमजान येताच साखरेच्या किमती गगनाला भिडल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये महागाईने जनता हवालदिल झाली आहे. आणि आता रमजान येताच खाण्या-पिण्याच्या वस्तू, खास करुन साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

गेल्या एक महिन्याच्या कालावधीत देशात साखरेच्या किमतींमध्ये किरकोळ बाजारात २० रुपये प्रती किलोची वाढ झाली आहे. तर घाऊक बाजारात साखरेची किंमत ४५०० रुपये प्रती ५० किलोचे पोते यावरुन वाढून ५,६०० रुपये प्रती पोते झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंजाबमध्ये ऊसाच्या समर्थन मूल्यामध्ये २३० रुपयांवरुन ३०० रुपये आणि सिंध प्रांतामध्ये २५० रुपयांवरुन ३०२ रुपये प्रती ४० किलो केल्यानंतर साखरेचे दर वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

अलिकडेच सिंधच्या मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर वासन यांनी सांगितले की, सिंध सरकारने नव्या ऊस पिकाचा दर ४५० रुपये प्रती ४० ग्रॅम निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव अंतिम मंजुरी साठी प्रांतिय कॅबिनेटकडे पाठविला आहे. जर त्यास मंजुरी मिळाली आणि तो लागू झाला तर साखरेच्या किरकोळ किमती १५० रुपये प्रती किलो या स्तरापर्यंत पोहोचू शकतील.

पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (PSMA)चे पदाधिकारी इस्कंदर खान यांनी साखरेच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचे कारण सांगताना सांगितले की, सरकारने २० टक्के कर आकारणी केली आहे. २.२ टक्के व्याजदर आणि ऊस दरवाढीमुळे साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. साखर उद्योगातून दहा लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देते आणि २०२१ पर्यंत त्याचा बाजाराचा आकार ५०१ बिलियन रुपयांचा झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उसाचे समर्थन मूल्य २०११ मधील १२६ रुपये प्रती ४० किलोग्रॅमवरुन वाढवून २०२२ मध्ये ३०० रुपये प्रती किलो केले आहे. एकूण पीक क्षेत्र २०११ मधील ४.३ टक्क्यांवुन २०२१ मध्ये पाच टक्क्यांवर गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here