देशात साखरेचे भाव सहा वर्षांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली : अपुरा पाऊस आणि आगामी हंगामात साखर उत्पादन घटण्याच्या शक्यतेने मंगळवारी देशातील साखरेचे भाव सहा वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले. दरम्यान, पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा करण्याचे धोरण सरकारने कायम ठेवले आहे.

देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात साखर निर्यातीला परवानगी न देण्याची शक्यता आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या साखर उत्पादक भारतामध्ये सध्या उच्च स्तरावर पोहोचलेली चलनवाढ ही चिंतेची बाब आहे. ग्राहक चलनवाढीचा दर जुलैमध्ये ७.४४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. धान्याच्या वाढत्या किमतींमुळे हा दर १५ महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

हिंदूस्थान टाइम्समुळे प्रकाशित वृत्तानुसार, तांदूळ, गव्हाच्या वाढलेल्या किमतींमुळे भारताने परदेशात या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले आहे. डाळींच्या शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिली आहे. भारतीय साखर कारखान्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात कमी पावसामुळे उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसामुळे भारतामध्ये कमी ऊस उत्पादन झाल्यास, सरकार एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामात सखरेच्या निर्यातीवर बंदी घालू शकते.

देशात सध्या १०.८ दशलक्ष टन साखर साठा आहे. सध्याची मागणी आणि सणासुदीच्या काळात मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रमाण पुरेसे आहे. सध्याची उपलब्धता गरजेपेक्षा जास्त आहे, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले होते. देशातील साखरेचा वार्षिक वापर सुमारे २७ दशलक्ष टन आहे. साखर उत्पादनाचा अधिकृत अंदाज लवकरच जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here