ढाका : बांगलादेशमध्ये सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण होत आहे. रमजानपूर्वी बाजार हळूहळू अस्थिर होत आहे. काही दिवसांपूर्वी साखरेच्या ५० किलोच्या पोत्याच्या दरात २०० टका (बांगलादेशी चलन) वाढ झाली होती. दोन दिवसांनी आणखी १०० टका वाढ झाली. किरकोळ स्तरावर सध्या दर किलोमागे पाच टका वाढला आहे. रमजानपूर्वी केवळ साखरेचे नाही तर इतर वस्तूंचे भावही वाढत आहेत.
एका विक्रेत्याने साखरेच्या वाढत्या दराबाबत साखरेचा बाजारात अपुरा पुरवठा हे कारण असल्याचे सांगितले. याशिवाय हरभऱ्याच्या भावात पाच टका वाढ झाली आहे. सध्या राजधानीच्या किरकोळ बाजारात हरभऱ्याचा भाव १०५ ते ११५ टका प्रती किलो आहे. आधीच वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. एका ग्राहकाने सांगितले, ज्याप्रकारे किंमती वाढत आहेत, त्यामुळे वस्तू खरेदी करणे अशक्य होत आहे.
दरम्यान, किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बेईमान सिंडिकेट कृत्रिम संकट निर्माण करून उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. सिंडिकेटने बाजारात उत्पादनांच्या किमती वाढवल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. पुरेशा प्रमाणात उत्पादन झाले नाही, त्यामुळे आम्हाला माल पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत सांगितले की, रमजानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुसह्य पातळीवर ठेवणे शक्य होईल याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या म्हणाल्या की, मला आशा आहे की रमजानच्या पवित्र महिन्यात महागाईचा दर स्वीकारार्ह पातळीवर राहील आणि बाजारात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य ठेवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही आधीच ग्राहकांच्या किमतींमध्ये होणारी असामान्य वाढ मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात यशस्वी झालो आहोत.