पुणे : राज्यात गेल्या दिड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील ऊस पिकाची स्थिती गंभीर बनली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने साखर उतारा घटून चालू हंगामात सुमारे १२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन कमी होऊ शकते, असा अंदाज साखर आयुक्तालयात झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन व डिजिटल करण्यात यावेत. गेल्या हंगामातील एफआरपी न दिलेल्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या बैठकीसाठी साखर संचालक (अर्थ) चे यशवंत गिरी, सहसंचालक (अर्थ) राजेश सुरवसे, विशेष लेखापरीक्षक साखर पुणे पांडुरंग मोहोळकर, विशेष लेखापरीक्षक सातारा अजय देशमुख, सहायक संचालक (अर्थ) बी एल साबळे, कार्यकारी संचालक राज्य सहकारी साखर संघाचे संजय खताळ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी उपस्थित होते.