देशातील अनेक साखर उत्पादक राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. तर महाराष्ट्रात आगामी काळात कारखाने बंद होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये १ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९५३.९४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ९८०.०८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १ मार्च २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात २२२.३५ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे तर २५९.७० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. येथील साखर उतारा ११.६८ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात साखर उताऱ्यात नेहमीच कोल्हापूर विभाग अग्रेसर राहिला आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे १ मार्च २०२२ पर्यंत २२४.०६ लाख टन उसाचे गाळप करून २०७.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.