सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६० लाख ६५ हजार ७०२ टन उसाचे गाळप झाले असून ६२ लाख २० हजार ४६५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.२६ टक्के आहे. उताऱ्यात ‘हुतात्मा’ तर गाळपात ‘सोनहिरा’ आघाडीवर आहे. जिल्ह्यातील १७ पैकी १० कारखाने सहकारी, तर ७ खासगी आहेत. यंदा प्रथमच ऊस तोडणी मजुरांसह ३०० हून अधिक ऊसतोडणी मंत्रांचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. जिल्ह्यातील उपलब्ध उसापैकी ७० टक्क्यांहून अधिक उसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह शेजारील कर्नाटक हद्दीतील सात कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर उचलत आहेत. गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेही उसाची वाढ खुंटली आहे. यामुळे यंदा एकरी सरासरी उत्पादन घटल्याचे शेतक-यांनी सांगितले. गतवर्षी एक एकरात ६० टन ऊस निघाला आहे, त्याच क्षेत्रात सध्या ४० टनही उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. तीनशेहून अधिक यंत्रांद्वारे तोडणी सुरु आहे.