सातारा : जिल्ह्यात १७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वी पार पाडला आहे. सर्वच कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. ऊस लागवड क्षेत्र घटल्याने मागील पाच वर्षांपासून साखर निर्मितीत सुरू असलेली वाढ थांबली आहे. यंदा जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ९४,३१,२८८ टन ऊस गाळप करून ९१,५०,०२७ क्विंटल साखर उत्पादन झाली आहे. मात्र, उसाचे क्षेत्र कमी झाल्याने गाळपास ऊस कमी पडला आहे. ३२०० रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत दर देण्यात आला आहे.
जिल्ह्यात यंदाच्या गाळपात खासगी तर साखर निर्मितीत सहकारी कारखान्यांची आघाडी घेतली आहे. यंदा निवडणुकीमुळे गळीत हंगामाला उशीर झाला. ऊस तोडणी यंत्रणा अनेक कारखान्यांची विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वेळेत ऊस न तुटल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकरी संघटनांकडून दरासाठी केली जाणारी आंदोलन यावेळी झालेली नाहीत. यामुळे विना अडथळा हंगाम सुरू राहिला आहे.
जिल्ह्यातील आठ सहकारी साखर कारखान्यांनी ४९ लाख ४७ हजार ८३३ गाळपाद्वारे ३९ लाख ९३ हजार ८५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर नऊ सहकारी कारखान्यांनी ४४ लाख ८३ हजार ४५५ टनाद्वारे ५१ लाख ५६ हजार ९४२ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून सरासरी ११.५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद झाले असून अनेक कारखान्यांची फेब्रुवारी व मार्च महिन्यांत तुटलेल्या उसाची बिले देणे बाकी आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज नवी-जुनी करण्यासाठी अडचणी येत आहेत. ऊसबिले जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे.