नवी दिल्ली : देशातील २०२४-२५ हंगामात उसाचे गाळप आणि साखर उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात १७.७० लाख टनांची घट झाली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (एनएफसीएसएफ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४९३ साखर कारखान्यांनी एकूण १०९५.६५ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यापासून ९५.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ५१८ साखर कारखान्यांनी १२२९.९१ लाख टन उसाचे गाळप करून ११२.८० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
देशातील साखरेचा सरासरी उतारा गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत साखरेचा सरासरी रिकव्हरी दर ८.६८ टक्के आहे तर गत हंगामात तो ९.१७ टक्के होता. राज्यनिहाय साखर उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील १९० कारखान्यांनी ३४७.६७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून २९.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशातील सर्व साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १२१ साखर कारखान्यांनी ३६६.२९ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून ३२.६० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तिसरे मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकात मागील हंगामाच्या तुलनेत आणखी चार जादा कारखाने सुरू आहेत. सध्या ७७ साखर कारखाने सुरू आहेत. गत हंगामात याच काळात ७३ कारखाने सुरू होते. कारखान्यांनी यंदा २४१.७६ लाख टन उसाचे गाळप झाल्यानंतर राज्यातील साखर उत्पादन २०.५५ लाख टनापर्यंत पोहोचले आहे. एनएफसीएसएफच्या अंदाजानुसार, २०२४-२५ या हंगामासाठी साखरेचे उत्पादन २८० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.