नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या व्यावसायिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात भारतातील साखर उत्पादन १३ टक्क्यांनी वाढून ३०५.६८ लाख टनावर पहोचले आहे. महाराष्ट्रात झालेले उसाचे सर्वाधिक उत्पादन हे यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. साखर उत्पादनाचे व्यावसायिक वर्ष ऑक्टोबरपासून सप्टेंबरपर्यंत गृहित धरले जाते.
इंडियन शुगर मिल असोसिएशनने म्हटले आहे की, देशभरातील साखर कारखान्यांनी एक ऑक्टोबर २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत ३०५.६८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २७०.०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी ३१ मे अखेर केवळ सात साखर कारखाने अद्याप गाळप करीत आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या दोन राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन ११०.१६ लाख टन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १२५.४६ लाख टन झाले होते.
महाराष्ट्रातील गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यात गेल्यावर्षी ६१.६९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन १०६.२८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन ३३.८० लाख टनावरून वाढून ४१.६७ लाख टन झाले आहे.
बाजारातील सूत्रांनी दिलेल्या अहवालानुसार आणि बंदरांवरील माहितीनुसार सरकारने मंजूर केलेल्या ६० लाख टन निर्यातीच्या कोट्यापैकी ५८ लाख टन साखर निर्यातीचे करार साखर कारखान्यांनी केले आहेत. इस्माने सांगितले की, जानेवारी २०२१ ते मे २०२१ या कालावधीत ४४-४५ लाख टन साखर देशातून निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय, साखर उद्योगाने गेल्या हंगामातील, २०१९-२० यामधील निर्यात कोट्याच्या तुलनेत ऑक्टोबर -डिसेंबर २०२० या कालावधीत ४.४८ लाख टन साखर निर्यात केली होती.
केंद्र सरकारने सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील स्थितीचा आढावा घेऊन २०२०-२१ या वर्षासाठी साखर निर्यातीसाठी देलेले ६००० रुपये अनुदान कमी करून ४००० रुपये प्रती टन केले आहे. साखर कारखाने आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ओजीएलअंतर्गत सरकारी अनुदानाशिवाय साखर निर्यात करीत असल्याची माहिती इस्माने दिली. तर इथेनॉल उत्पादनाच्या एकूण ३४६.५२ कोटी लिटरच्या एकूण मागणीपैकी ३२१.१८ कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. आणि २४ मे २०२१ अखेर १४५.३८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे.