नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदाच्या गाळप हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत ७७ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. त्यामुळे देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट येण्याचा अंदाज महासंघाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ५३१ कारखान्यांपैकी ५०५ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता. यंदा ४५४ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी साखरेच्या विक्री किंमतीत वाढ करण्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, देशात १५ फेब्रुवारीपर्यंत २१७.५ दशलक्ष टन ऊसाचे गाळप करून सरासरी साखर उतारा ९.९ टक्के आला.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशातील साखर उत्पादन चालू साखर वर्षात २७ दशलक्ष राहण्याचा अंदाज आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने म्हटले आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात ३० कारखान्यांनी गाळप हंगाम आटोपला असून ७४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. सरासरी उतारा ९.२० टक्के आला आहे. साखर उत्पादन ६.८१ दशलक्ष टनांवर पोहचले आहे. देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.९ दशलक्ष टनांनी साखर उत्पादन घट येण्याचा अंदाज आहे. तर देशात २६.५२ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोशिएशनने व्यक्त केला आहे. सहकारी साखर कारखानदारांच्या मालक संघटनेनं २८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज दिला आहे. इस्माने दुसऱ्या साखर उत्पादन अंदाजात उत्पादनात घट वर्तवत २७.२७ दशलक्ष साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.