सांगली : यंदा पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे गाळप कमी होवून साखरेचे उत्पादनही घटणार आहे, असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. भविष्यात साखरेच्या दरवाढीने कारखान्यांना चांगले दिवस येतील. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.आरग (ता. मिरज) येथे मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे- म्हैसाळकर होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सभासदांनी कारखान्याच्या उप प्रकल्पांना सहकार्य करावे. कारखान्याने कठीण परिस्थितीतही चांगली कामगिरी केली आहे.
मनोज शिंदे- म्हैसाळकर म्हणाले, यंदाचा गळीत हंगाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी सहकार्य करावे. सभासद व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनेक संकटांना तोंड देत कारखाना सुरू ठेवला आहे. कारखान्याने आजअखेर एफआरपीपोटी १२७ कोटी रुपये दिले आहेत. प्रारंभी अशोककुमार पाटील व मिरज दुय्यम आवाराचे सभापती बापूसाहेब बुरसे यांच्या हस्ते प्रतीमा पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी नोटीस वाचन केले. संचालक विजयसिंह भोसले यांनी अहवाल वाचन केले. संचालक मोहन शिंदे यांनी आभार मानले. सभेला देवदास धोंड, काकासाहेब कुंडले, चॉदसाहेब पाटील, आदिनाथ बेले, बाळासाहेब कदम, राजाराम शिरदवाडे, संतोष देसाई, अण्णासाहेब कुरणे, बी. के. पाटील, बाळासाहेब होनमोरे, अशोक वडगावे, दादासाहेब पाटील, सुरेश कोळेकर, लतिफराव सावंत, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.