नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याने हंगाम २०२२-२३ च्या तुलनेत पुढील हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखर उत्पादन ३.४१ टक्क्यांनी घटून ३१.६८ मिलियन टन (MT) होईल असे अनुमान असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने म्हटले आहे. देशातील उसाचे क्षेत्रफळ २०२३-२४ मध्ये जवळपास ५.९८ मिलियन हेक्टर असण्याची शक्यता आहे. हे लागवड क्षेत्र चालू हंगामाच्या तुलनेत समान आहे. चालू हंगामातील साखर उत्पादन ३२.८ मेट्रिक टन होईल अशी अपेक्षा आहे.
सद्यस्थितीत ४०य९५ लाख टनाच्या तुलनेत आगामी हंगामात ४५ लाख टन साखर डायव्हर्शन इथेनॉल उत्पादनासाठी केली जाऊ शकते.
ISMA ने म्हटले आहे की, देशांतर्गत साखरचा खप २७.५ मिलियन टन आणि ४.२ मिलियन टन अतिरिक्त साखर असू शकेल. चालू हंगामात भारताने ६ मिलियन टन साखरेची निर्यात केली आहे. एकूण साखर निर्यातीत इंडोनेशिया, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणि जिबुती यांचा हिस्सा मोठा आहे. २०२१-२२ मध्ये भारताने उच्चांकी ११.२ मिलियन टन साखरेची निर्यात केली होती.
जून महिन्यात सरकारने २०२३-२४ या हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या उसाच्या योग्य आणि लाभदायी दरात (एफआरपी) गेल्यावर्षीच्या तुलनेत ३ टक्के वाढ (३१५ रुपये प्रती क्विंटल) करण्यास मंजुरी दिली. एफआरपीमधील वाढ १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामाला लागू होईल. यासाठी साखर उतारा १०.२५ टक्के असणे गरजेचे आहे.
ISMA ने सरकारकडे उसाच्या एफआरपीमध्ये वाढीनंतर साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१ रुपये प्रती किलो या सध्याच्या स्तरावरून वाढवून किमान ३६-३७ रुपये प्रती किलो करण्याची मागणी केली आहे.