पावसाने मारलेली दडी हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दिल्लीत ऊस आणि साखर आयुक्तांच्या अखिल भारतीय बैठकीत (All-India meeting) कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणी संकटावर चर्चा झाली.
या बैठकीत सांगण्यात आले की, खराब दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे (southwest monsoon) ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असून, त्याचा परिणाम ऊस आणि साखर उत्पादनावर होणार आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटक हे भारतातील तिसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य आहे. भारतातील साखरेच्या मागणीपैकी १० टक्के साखरेची मागणी कर्नाटकातून पूर्ण केली जाते.
बैठकीत उपस्थित असलेल्या कर्नाटकच्या एका अधिकाऱ्याने न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, कमी पावसामुळे यावर्षी ऊस उत्पादनात १०-१५ टक्क्यांची कमतरता आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर उत्पादनातील तुट आणखी वाढू शकते.