लखनऊ: उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांनी आजअखेर ६११ लाख टन उसाचे गाळप केले असून ६३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मात्र, सरासरी उतारा घटल्याने राज्यात या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश साखर कारखाना असोसिएशनने (यूसीएसएमए) ही माहिती दिली आहे.
यूपीएसएमएने दिलेल्या माहितीनुसार, साखर हंगाम २०२०-२१ ची सुरुवात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झाली. खासगी, सहकारी आणि राज्य शासनाच्या अधिपत्याखालील एकूण १२० साखर कारखान्यांनी हंगामात गाळप सुरू केले. नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत सर्वच साखर कारखान्यांकडून गाळप सुरू झाले. १२ फेब्रुवारीअखेर ६११ लाख टन उस गाळपासह ६३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत ५८४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामधून ६४ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. गेल्यावर्षी याच कालावधीत सरासरी साखर उतारा १०.९६ टक्के होता. हा साखर उतारा यंदा १०.२९ टक्के इतका आहे. साखर हंगाम २०२०-२१ मध्ये प्रामुख्याने साखर उतारा घटल्याचे दिसून येत आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या हंगााच्या तुलनेत साखरेचाउतारा ०.५० टक्क्यांनी घटू शकतो. सध्या बाजारातील साखरेची मागणी खालावली असल्याचे यूपीएसएमचे म्हणणे आहे. लग्नसराईच्या हंगामामुळे होणारी साखरेची मागणी कमी झाली आहे. याशिवाय कोणताही सण दृष्टीपथात येत नाही. त्यामुळे साखरेची खरेदी कमी झाली आहे. साखरेचा एमएसपी वाढवावा अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलांचे पैसे द्यायला मदत मिळू शकेल.