जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश भारतामध्ये ९ जून रोजी सकाळी साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. यापूर्वी अमेरिकन शुगर फ्युचर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. या मान्सून हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे साखर उत्पादनात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शुगर सेक्टरमधील स्टॉक्समध्ये तेजी आली. अल निनोच्या इफेक्टमुळे भारतात कमी पाऊस कोसळतो.
मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ८ जून रोजी अमेरिकन साखर वायदा (यूएस शुगर फ्युचर्स) ४ टक्क्यांनी वाढून २५.४८ डॉलरवर आला होता. यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फिरीक अॅडमिनीस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने ८ जून रोजी सांगितले की, अल निनो दाखल झाला आहे. त्यामुळे जगातील तापमान आणखी वाढेल. वैज्ञानिक मिशेल एल हेयुरेक्स यांनी अल निनोमुळे पाऊस कमी पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या २०२२-२३ या विपणन वर्षात १५ एप्रिलअखेर भारताचे साखर उत्पादन ६ टक्क्यांनी घसरून ३११ लाख टनावर आल्याचे म्हटले होते. अल निनोमुळे उत्पादन घसरून साखरेच्या किमती आणखी वाढतील अशी शक्यता आहे.