बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
कोल्हापुर: चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविलेल्या राज्यातील ३९ साखर कारखान्यांची साखर आता जप्त होणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी, या साखर कारखान्यांनी एक रुपयाही एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केलेली नाही. साखर जप्त होणाऱ्या कारखान्यांच्या यादीत १८ खासगी आणि २१ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या जास्त आहे.
साखरेला जागतिक बाजारपेठेत भाव नाही तर, देशांतर्गत बाजारात मागणी नाही. त्यामुळे एक रकमी नाही तर, टप्प्या टप्प्याने एफआरपी देण्याचा पर्याय कारखान्यांनी सुचवला होता. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला होता. एक रकमी एफआरपीसाठी आग्रही असलेल्या संघटनेने २८ जानेवारीला पुण्यात साखर संकुलावर हल्लाबोल आंदोलन केले होते. त्यावेळी साखर आयुक्त गायकवाड यांनी एफआरपी थकविणाऱ्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आश्वसनाप्रमाणे साखर आयुक्तांनी तातडीने एफआरपी थकविणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ३९ साखर कारखान्यांनी एक रुपयाही दिलेला नाही. त्यांच्याकडे एकूण १ हजार ८१३ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे या कारखान्यांची साखर जप्ता करून ती विकून येणाऱ्या पैशांतून शेतकऱ्यांची देणी भागवण्यात येणार आहेत.
जप्तीची कारवाई होणाऱ्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त-शिरोळ, जवाहर, पंचगंगा, शरद, वारणा, गुरुदत्त, संताजी घोरपडे, इको केन शुगर यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील महाकाली, वसंतदादा, केन अॅग्रो, निनाईदेवी आणि विश्वासराव नाईक या कारखान्यांची साखर जप्त होणार आहे. साताऱ्याती किसन वीर-भुईंज, किसन वीर-प्रतापगड, किसन वीर-खंडाळा यांची तर, सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल पांडे, गोकुळ शुगर, कुरभदास, सिद्धेश्वर, बबनराव शिंदे, जयहिंद शुगर यांची साखर जप्त होणार आहे. जळगावमधील मधूकर, जालन्यातील समृद्धी शुगर, रामेश्वर तसेच बीडमधील माजलगाव, वैद्यनाथ, जय महेश शुगर, जय भवानी, परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर, त्रिधारा शुगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शीला अतुल शुगर, शंभो महादेव, लातूर जिल्ह्यातील पनगेश्वर, श्री साईबाब शुगर, अहमदनगर जिल्ह्यातील गणेश, डॉ. बी. बी. तनपुरे, औरंगाबादमधील शरद तसेच नागपूरमधील व्यंकटेश्वरा साखर कारखान्याची साखर जप्त होणार आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp