हि बातमी तुम्ही आता ऐकू ही शकता
पुणे : चीनी मंडी
थकीत एफआरपीचा वाढत चाललेला डोंगर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा वाढलेला रोष लक्षात घेऊन साखर कारखान्यांना साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करून देण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात येत्या काही दिवसांत साखर महागण्याची चिन्हे असून, ग्राहकांच्या खिशाला प्रति किलो तीन ते चार रुपयांचा चाट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये प्रति किलो आहे. साखर उद्योगातून हा दर ३६ रुपये प्रति किलो करण्याची मागणी केली जात आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला राज्यांमधील निवडणुकीत मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीतही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची भीती सत्ताधारी पक्षाला आहे. एफआरपी थकल्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऊस उत्पादकांमध्ये सरकारविषयी प्रचंड रोष आहे. त्याचे रुपांतर आगामी लोकसभा निवडणुकीत मतपेटीत होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून सरकार ३६ रुपये किलो ऐवजी सन्माननीय तोडगा म्हणून किमान विक्री दर ३२ रुपये प्रति किलो करण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील ग्राहकांसाठी साखर तीन ते चार रुपयांनी महागण्याची शक्यता साखर उद्योगातून वर्तवली जात आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp